धुळे : धुळे ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी दिली आहे. या क्षयरोग मोहिमेतंर्गत धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 लाख 90 हजार 766 नागरिकांची या मोहिमेदरम्यान घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरुग्ण शोध मोहीमेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, सर्व क्षयरोग विभागातील कर्मचारी धुळे ग्रामीण भागातील अति जोखमीच्या भागात जाऊन 38 हजार 153 घरांचे सर्वेक्षण करुन क्षयरोगांची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णाची मोफत थुंकीचे नमुने तपासणी व एक्सरे तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी आशा सेविका, क्षेत्रीय कर्मचारी, स्वंयसेवक, पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ज्या घरातील सदस्यांची तपासणी झाल्यावर अशा घरावर चिन्हांकीत करण्यात येणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या क्षयरोग शोध मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सोनिया बागडे यांनी केले आहे.