धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफी पेढीवर सोमवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला. सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक कोटी १० लाखाचा मुद्देमाल चोरण्यात आला. पहाटे दोन ते तीन या वेळेत चोरांनी स्वर्ग पॅलेस ज्वेलर्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या दरवाजाची कडी कटरच्या सहाय्याने कापली. शोभेच्या बंदिस्त टेबलावरील काचा फोडून शक्य तेवढे दागिने आणि हाती लागेल तेवढी रोकड घेऊन त्यांनी दुकानाच्या मागील गल्लीतून अंधाराचा फायदा घेत पलायन केले, अशी माहिती स्वर्ण पॅलेसचे मालक प्रकाश चौधरी यांनी दिली. ही चोरी करण्याआधी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

