पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध समीक्षक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (७५) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डाॅ. कोत्तापल्ले यांना १४ नोव्हेंबर रोजी विषाणू संसर्गाचे निदान झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेचा आधार त्यांना दिला होता. दोन दिवसांत प्रकृतीत चढउतार झाल्याने ते अत्यवस्थ होते. अखेरीस बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कथा, लघुकथा, कविता, कादंबरी, अनुवाद तसेच समीक्षा व संपादन अशी बहुआयामी साहित्यिक कारकीर्द, हे डाॅ.कोत्तापल्ले यांचे वैशिष्ट्य होते. चिपळूण येथील ८६ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या अनेक साहित्यकृतींना शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.