अकोले : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, अकोले औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ‘हॅंडी मल्चिंग मशीन’ या शेतीपूरक उपकरणास द्वितीय क्रमांक मिळाला. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात जिल्ह्यातून २७ शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृषी, पारंपरिक ऊर्जा, पाणी बचत, फॅशन, खाद्यपदार्थ, यांत्रिक मॉडेल्स अशी ७० उपकरणे सादर केली. प्रदर्शनाचे परीक्षण जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केले.
अभियांत्रिकी गटातून अकोले आयटीआयचे वेल्डर निदेशक बाबासाहेब धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साबळे व सहयोगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या उपकरणास द्वितीय क्रमांक मिळाला. पारितोषिक वितरण निवृत्त शिक्षण संचालक दिनकर टेमकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस डी शिंदे, शासकीय आयटीआय अहमदनगरचे प्राचार्य खालेद जहागीरदार, आयएमसी अध्यक्ष व्ही. आर. इंगळे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष रवी डिक्रूज, रोटरी क्लबच्या सचिव चंदना शहा-गांधी, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. आसाराम खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तरूणांनी तंत्र व व्यवसाय शिक्षणाकडे वळावे यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या ‘विचार बदला, आयुष्य बदलेल’ या मॉडेलचे परीक्षण समितीने कौतुक केले. गुरुवारी (१ डिसेंबर) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक येथे विभागीय पातळीवर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनात हे उपकरण सहभागी होणार आहे. विभागीय पातळीवर एकूण ६ जिल्ह्यातून पहिले ३ क्रमांकावरील उपकरणे या तंत्र प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.