कोल्हापूर : कोल्हापुरातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. लवकरच त्याचे अंदाजपत्रक करून निधीची मागणी केली जाईल. महाराष्ट्रात सर्वत्र सिमेंट-काँक्रिटचे रस्ते तयार व्हावेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांचे धोरण आहे. त्यानुसार कोल्हापुरातही 100 कोटीतून सिमेंट-काँक्रिटचे रस्ते करण्यास प्राधान्य देण्यात येईल. महापालिकेलाही तशा सूचना देऊ, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काही वर्षांत शहरात केलेले रस्ते खराब झाले आहेत. गॅरंटी कालावधीतील रस्ते संबंधित ठेकेदारांकडून करून घेण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे येथील सर्वच प्रकल्पांना गती देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऐतिहासिक रंकाळा अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न आहे. तलावातील पाण्याचेही शुद्धीकरण केले जाणार आहे. शालिनी पॅलेस कोल्हापूरचे वैभव आहे. तो सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन धोरण निर्माण करण्यासाठी सूचना केल्या आहेत.
शेंडा पार्कमध्ये प्रशासकीय संकुल उभारण्यास मान्यता देण्यात येणार आहे. आयटी पार्क उभारण्याचे प्रयत्न आहेत. आता विमानतळ सुसज्ज झाले आहे. चांगले इंजिनिअर्स आणि मनुष्यबळही आहे. त्यांना कोल्हापूरातच काम करण्याची संधी मिळेल. खेळाडूंसाठी 25 कोटींचे मैदान उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तालीम-संस्थांची दुरूस्ती करून गतवैभव मिळवून देण्याबरोबरच कोल्हापुरी कुस्ती, कला, मर्दानी खेळ जगापुढे घेऊन जाऊ. अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहाचे काम थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. या परिसरातील शासकीय कार्यालये हलविल्यानंतर अंबाबाई मंदिर परिसर अत्यंत सुंदर करण्यात येईल. यावेळी खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रवीकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त विनायक औंधकर उपस्थित होते. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे; पण न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून गोरगरिबांच्या घरांना कशी सूट देता येईल, याबाबत सरकार विचार करत असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गायरानात कोणी वाडा बांधला असेल; तर तो कसा काय नियमित करता येईल? असा सवाल करून केसरकर म्हणाले की, गायरानमध्ये गोरगरिबांच्या घरांना धक्का लागू नये, यासाठी कशाप्रकारे सूट देता येईल, याबाबत सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे गरिबांची घरे काढण्याची घाई केली जाणार नाही, याची दक्षता घेऊ. उद्धव ठाकरे यांनी हे सरकार दुबळे आहे, अशी टीका केली आहे. त्यावर बोलताना केसरकर यांनी, सरकारची ताकद कमी पडली की वाढली, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे; पण ठाकरे यांनी त्यांच्या काळात दाखवलेली स्वतःची निष्क्रियता लपविण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारवर खापर फोडू नये.


