पिंपरी : पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 15 नोव्हेंबर रोजी अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारला. त्यानंतर त्यांच्या पथकाने पिंपरी, देहूरोड, वाकड भागातील अवैध धंद्यांवर छापे मारले. दरम्यान, या छाप्यानंतर शहर पोलिस दलात संलग्न आणि निलंबनाचे सत्र सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे निगडी येथील रस्त्याने जात होते. त्या वेळी त्यांना आकुर्डी येथील पवळे उड्डाण पुलानजीक अवैध लॉटरी सेंटर असल्याचे सोबत असलेल्या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी स्वतः जाऊन पाहणी करीत कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी पिंपरी, देहूरोड, वाकड भागात छापेमारी केली. दरम्यान, आयुक्तांनी सुरुवातीला निगडीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांना नियंत्रण कक्ष येथे संलग्न केले. तसेच, देहूरोड येथील सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे आणि वाकडचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, संभाजी जाधव यांच्यासह तब्ब्ल अठरा कर्मचार्यांना बावधन येथील वाहतूक विभागाला संलग्न केले.
18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काढलेल्या या आदेशामुळे एकाच खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी (दि. 23) रात्री निगडी पोलिस ठाण्यातील तपास पथकात असलेले कर्मचारी सतीश ढोले, विलास केकाण, राहुल मिसाळ, नितीन सपकाळ या चौघांना थेट निलंबित करण्याचे आदेश दिले. ज्यामुळे आयुक्तालयातील पोलिस धास्तावल्याचे चित्र आहे. अवैध लॉटरी सेंटरच्या कारणावरून निगडीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, देहूरोड आणि वाकड येथेदेखील कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित वरिष्ठ निरीक्षकांना अभय देऊन इतर अधिकारी व कर्मचार्यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आयुक्तालयातील अधिकार्यांशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. कारवाई झाल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस थेट एका राजकीय नेत्याकडे ‘दादा मला वाचवा’, असे म्हणत लोटांगण घालत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे असल्याच्या कारणावरून दोन वरिष्ठ निरीक्षकांना देखील हटवण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केला होता. मात्र, संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी राजकीय दबाव वापरून पुन्हा ‘बॅक टू पॅव्हेलियन’ केल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे.