अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ट्रम्प यांचं खातं पुन्हा सुरू करावं की नाही, यासाठी ट्विटरकडून पोल घेण्यात आला होता. या पोलच्या सकारात्मक निकालानंतर आता ट्रम्प यांचं खातं पुन्हा सक्रीय करण्यात आलं आहे. कॅपिटॉल हिंसारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं खातं ट्विटरकडून बंद करण्यात आलं होतं.
“जनतेनं सांगितल्याप्रमाणे ट्रम्प यांचं खात पुन्हा सुरू करण्यात येईल”, असं ट्वीट एलॉन मस्क यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच ट्रम्प यांचं खातं सक्रीय करण्यात आलं. हे ट्वीट करताना मस्क यांनी एका लॅटिन म्हणीचा वापर केला आहे. ‘वॉक्स पॉप्युली, वोक्स डेई’ अर्थात लोकांचा आवाज म्हणजेच देवाचा आवाज, असं मस्क म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचं खातं सुरू करण्याबाबत शनिवारी एलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वापसी ट्विटरवर करावी की नाही? असा सवाल पोलद्वारे युजर्संना विचारण्यात आला होता. यावर ५१.८ टक्के युजर्सने ट्रम्प यांचं खातं पुन्हा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
दरम्यान, ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू असतानाच शनिवारी एलॉन मस्क यांनी नवं ‘कंटेंट मॉडरेशन’ धोरण जाहीर केलं आहे. त्याचबरोबर काही बंद खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही ट्विटरनं घेतला आहे. “नकारात्मक आणि द्वेषयुक्त ट्विट्स काढून टाकले जातील. अशा ट्विट्सच्या जाहिराती ट्विटर चालवणार नाही. जोपर्यंत ट्विट्स विशेषत: शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत ते सापडणार नाहीत”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. हे नियम केवळ वैयक्तिक ट्विटला लागू असून संपूर्ण खात्याला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.