मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – मशीद रोड रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल धोकादायक झाला असल्याने त्याचे पाडकाम शनिवारी, १९ नोव्हेंबर रात्री ११ वाजल्यापासून सुरू झाले. या कामासाठी मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. तसेच, ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांपैकी अप आणि डाऊनला जाणाऱ्या एकूण १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
२७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये १७ तासांचा ब्लॉक सीएसएमटी – भायखळय़ादरम्यान शनिवारी रात्री ११ वाजता सुरू झाला. तो रविवारी दुपारी ४ वाजता संपुष्टात येईल. याचप्रमाणे, हार्बर मार्गावरील २१ तासांचा ब्लॉक सीएसएमटी – वडाळय़ादरम्यान शनिवारी रात्री ११ वाजता सुरू झाला असून तो रात्री ८ वाजता संपुष्टात येईल. त्यानंतरच मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकलची संपूर्ण वाहतूक सुरळीत होईल. उर्वरित, मेल एक्स्प्रेस यार्डलाइनची वाहतूक २७ तासांनंतर म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरू होईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीएसएमटी-भायखळा, वडाळादरम्यान लोकल फेऱ्या चालविण्यात येणार नाहीत. ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांपैकी अप आणि डाऊनला जाणाऱ्या एकूण १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भायखळा, परेल, कुर्ला, दादर या स्थानकांतून ठाणे, कल्याण तसेच कर्जत- कसारा या स्थानकांदरम्यान लोकल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावर वडाळा ते पनवेल आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान लोकल धावतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० पासून २० नोव्हेंबर रोजी पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवस (१९ ते २१ नोव्हेंबर) अप आणि डाऊन मार्गावरील ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे मार्गावरील इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस, सिहंगड एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन यासह अन्य गाडय़ांचा समावेश आहे. याशिवाय ६८ मेल एक्स्प्रेस गाडय़ांना दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक या स्थानकांतच शेवटचा थांबा दिला असून येथून काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणार आहेत.
२७ तासांचा कालावधी..
सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली बांधण्यात आलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. कर्नाक उड्डाणपुलाला तडे गेलेअसून पुलाचा पायाही खराब झाला आहे. त्याच्या खांबांनाही तडे गेले आहेत. हा पूल २२ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर २ सप्टेंबर २०२२ पासून रेल्वे हद्दीतील किरकोळ पाडकामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता २७ तासांच्या मेगाब्लॉकमध्ये कर्नाक उड्डाणपुलाचा रेल्वे रुळावरील गर्डर हटवण्यात येईल आणि अन्य पाडकामही केले जाणार आहे.