औरंगाबाद : शेजारील महिला आणि तिचे कुटूंब त्रास देतात आणि यांना माझा पतीही यांना सामिल असल्याचे आरोप केला होता. आता जगणं असहाय्य झालंय, अशी चिठ्ठी लिहित सविता दीपक काळे (३४, रा. मांडवा, ता. गंगापूर) या महिलेने गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयातच पेटवून घेतले. ६० टक्के भाजलेल्या सवितावर घाटीत उपचार सुरू होते. परंतु १४ तासांनंतर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबली आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजता तिचा मृत्यू झाला, अशी माहिती बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. याप्रकरणी सविताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास होकार दर्शवला आहे. शेजारची महिला त्रास देते. तिचे ऐकून पती मारहाण करतात. याची तक्रार सदर मृत महिलेने पोलिस ठाण्यात केली होती. पण वाळूज ठाण्यातील पोलिसांनी याची योग्य अशी दखल घेतली नाही. यानंतर जीवनात असहाय्य त्रास होतोय, असे म्हणत सविताने पोलिस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सविता यांचा २००२ मध्ये दीपक काळे यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. दीपक खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो. त्यांच्यात मागील दहा वर्षांपासून सतत वाद होत होते. या वादात दीपक अनेकवेळा सविता यांना मारहाण करत. तसेच, ज्या महिलेवर संशय आहे, तिच्यासह तिचा पती, मुलगा हेदेखील सविता यांना त्रास देत. ते या ना त्या कारणावरून सविता यांच्याशी वाद घालणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे प्रकार मागील अनेक दिवसांपासून करत होते. त्यांना पती दीपक हेदेखील साथ देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.