मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा व सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिके’चा शुभारंभ करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (१ सप्टेंबर) दिली. अमित शहा ५ तारखेला मुंबईत येतील. ते प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेतील. याशिवाय सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन होतील. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.
२९ वर्षांपासूनची सत्ता उलथवण्याची रणनीती २९ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत २२७ नगरसेवक आहेत. या वेळी भाजपचे मिशन २०० असेल. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.











