अकोला : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज अकोला ते बार्शीटाकळी मार्गांवरुन जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने सायकल रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज सकाळी सहा वा. सायकल रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नेहरु युवा केंद्र व एनसीसीचे विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक मिरा पागोरे, सचिन पाटील आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु होवून कौलखेड, कान्हेरी सरपमार्ग, विश्रामगृह बार्शीटाकळीपर्यंत गेली. तेथून परत कान्हेरी सरपमार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अकोला-बार्शीटाकळी मार्गांवरुन जातांना व येतांना भारत माता की जय च्या घोषणा देत होते. त्यांना नागरिक प्रतिसाद देत होते.