अकोला : जिल्ह्यात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मोठे. मध्यम व लघु पाटबंधारे जलप्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. तथापि, सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या जलप्रकल्पांवर पर्यटकांना प्रवेशास निर्बंध घालावे व प्रवेशास मनाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी पाटबंधारे व सिंचन विभागास दिले आहेत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व ३३ लघु प्रकल्प आहेत. काटेपूर्णा प्रकल्पात ८२.४७ टक्के जलसाठा झाला आहे. अन्य लहान, मध्यम प्रकल्प सुद्धा ८० ते १०० टक्के भरले आहेत. अद्याप पावसाचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे जलसाठ्यात वाढच होणार आहे. दरम्यान यातील काही प्रकल्पांवर गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन कार्यक्रम करण्याचाही प्रघात आहे. तसेच अशा प्रकल्पांवर पर्यटकही मोठ्या प्रमाणावर पावसाळी पर्यटनासाठी जात असतात. अशा ठिकाणी व्यक्ती बुडून मृत्यू झाल्याच्या घटनाही पूर्वी घडल्या आहेत. तथापि, दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा भाग म्हणून पर्यटकांना प्रकल्पांवर येण्यास मनाई करावी. तसेच गणेश, दुर्गा विसर्जन करण्यासही निर्बंध घालावे,असे आदेशात म्हटले आहे.