मुंबई : काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जवळपास 25 आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. मीडियामध्ये विविध आमदारांची नावेही येत आहेत. सकाळपासून माध्यमांमध्ये येत असलेल्या शिवसेनेच्या आमदार यादीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचेही नाव होते. आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार, नितीन देशमुख यांना पहाटे गंभीरावस्थेत सूरतमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने रुग्णालयातील विशेष कक्ष क्रमांक 15 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या वॉर्डबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे ठाण्यातील अनेक कट्टर समर्थक आणि नगरसेवक हेदेखील नॉट रिचेबल असून सर्व नेते पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडीदेखील शिंदे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आली आहे.