मुंबई : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नवा कोणता बदल होणार यावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या भेटीनंतर महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, आमच्या भेटीत लपवण्यासारखं काही नाही. सूडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व चुकीचे राजकारण शिकवत नाही; काही लोक फक्त त्यांच्या अजेंडांसाठी काम करतात. आपल्याला आपला देशाला योग्य मार्गावर आणायचा आहे; पंतप्रधान कोण असेल यावर नंतर चर्चा होऊ शकते. त्यापूर्वी आम्ही देशातील अनेक राजकीय नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करू अशीही त्यांनी माहिती दिली.