नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या ( Assembly Elections ) प्रचारावर लादण्यात आलेले सर्व निर्बंध लवकरच उठविले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे निर्बंध हटविण्यात आले तर राजकीय पक्षांना पूर्वीप्रमाणे रॅली काढणे, रोड शो घेणे आणि जाहीर सभांचे आयोजन करण्यास परवानगी मिळेल. सध्या रॅली काढणे व रोड शो घेण्यास प्रतिबंध आहे. तर एकूण मैदान क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्याला परवानगी आहे.
उ. प्रदेशातील ४ तर मणिपूरचे दोन टप्प्यांसाठी मतदान
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी उत्तराखंड, गोवा तसेच पंजाब राज्याचे मतदान पार पडले असून उत्तर प्रदेशच्या तीन टप्प्यातले मतदानही झाले आहे. येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील चार टप्प्यांचे तर मणिपूरचे दोन टप्प्यातले मतदान होणार आहे. सध्या पदयात्रा काढण्यासाठी व घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. ही मर्यादा सुध्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समाप्त केली जाऊ शकते, असे समजते. सध्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी 20 लोकांची मर्यादा आहे. कोरोनाचे संकट बऱ्यापैकी कमी झाल्याने प्रचारावरचे निर्बंध हटविले जाऊ शकतात.