अहेरीत सर्वाधिक बीजेपी 6,राष्ट्रवादी शिवसेना युती 5,आवीस 5 तर अपक्ष 1 जागेवर विजयी.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- अहेरी नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रिशंकू मतदानाचा कौल मतदारांनी दिल्याने एक हाती सत्ता स्थापनेचा बीजेपी व राष्ट्रवादी- शिवसेना युती चे स्वप्न आदिवासी विद्यार्थी संघाने धुळीस मिळविल्याचे निकालावरून दिसते.आदिवासी विद्यार्थी संघाच्या कार्यप्रणाली वरून किंग मेकर बनण्याची शक्यता वर्तविली होती.आजच्या नगरपंचायत च्या निवडणूक निकालावरून भारतीय जनता पार्टीला सहा, राष्ट्रवादी- शिवसेना युतीला अनुक्रमे तीन व दोन असे एकूण पाच,अपक्ष एक तर किंग मेकर ची भूमिका निभाऊ शकणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटना पहिल्यांदाच पाच विजयी शिलेदारांच्या अनुषंगाने अहेरी नगरपंचायत मध्ये संधीचे सोने करण्याची सोनेरी चिन्हे मतदारांनी दिल्याचे निकालावरून दिसते.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वामध्ये जनता पक्षातील सहा विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून विकास उईके हे 37 मतांनी तर प्रभाग क्रमांक सहा मधून रूपाली नामेवार 76 मतांनी निवडणूक जिंकल्या. प्रभाग क्रमांक सात मध्ये राजघराण्यातील जगन्नाथ आत्राम 89 मतांनी तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुनिता मंथनवार 39 मतांनी जिंकून आले. सोबतच प्रभाग क्रमांक 11 मध्ये लक्ष्मी मद्दीवार त्यांनी भरघोष 131 मतांनी विरोधकाला चीत केले. तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये शालिनी पोहणेकर यांनी 33 मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केले.अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम व शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या संकल्पनेतील राष्ट्रवादी- शिवसेना युतीला अहेरी नगरपंचायत च्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याने स्वबळावर सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग पडले. प्रभाग क्रमांक 3 मधून नगरपंचायत च्या मागील व आजच्या निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक जास्त 244 मतांनी निवडून येणारे अमोल मुक्कावार तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये शैलेश पटवर्धन हे 80 मतांनी विजयी झाले. दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार माजी नगरसेवक होते. प्रभाग क्रमांक 9 मधून ज्योती नरेंद्र सडमेक यांनी 42 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. शिवसेनेने प्रभाग क्रमांक दोन मधून विलास सिडाम ज्यांच्या 12 मतांच्या फरकाने निसटता विजय तर प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख यांची मुलगी नौराज शेख या 31 मतांनी विजयी झाले आहेत.मतमोजणीच्या बारा प्रभागा पर्यंत एकमेव जागा मिळविलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वातील आदिवासी विद्यार्थी संघाने बाकी पाच प्रभागांपैकी चार जागा जिंकून एकूण पाच प्रभागात विजय संपादन केला आहे.यात प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुरेखा गोडसेलवार या 80 मतांनी तर मीना ओंडरे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून 37 मतांनी विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक 14 व 16 मध्ये अनुक्रमे महेश बाकेवार व रोजा करपेत यांनी 35 व 49 मतांनी विजय संपादन केला.तसेच प्रभाग क्रमांक 17 मध्ये विलास गलबले विजय झाल्याने नगर पंचायतीच्या निकालात एक हाती सत्ता स्थापनेची बीजेपी व राष्ट्रवादीची इच्छा आविस शिवाय पूर्ण होणार नसल्याने किंग मेकर च्या भूमिकेकडे अहेरीकरांचे लक्ष लागले आहे.महाविकास आघाडी मध्ये मंत्री असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेतून आवीस आघाडीत सामील होऊ शकते अथवा राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी बीजेपी सोबत सुद्धा सत्ता स्थापन करू शकत असल्याच्या चर्चांना लवकरच पूर्णविराम लागणार हे नक्की.