वृषभ दरोडे तालुका प्रतनिधी राळेगाव
बेंबळा प्रकल्पाने हेड पासून तर टेल पर्यंत हजारो हेकटर जमिनी ओलिताखाली येणार. शेतकरी सुजलाम सुफलाम होनार असे हिरवेगार स्वप्न तर दाखवले
ते प्रत्यक्षात काही आले नाही. अनेकांच्या सुपीक जमिनी घशाखाली घालून त्यांना मोबदला देखील नाकारण्यात आला. बांधापर्यंत तर पाणी पोहचले नाही मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या डोळ्यात ते दाटुन आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून शेताचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्याच्या संयमाचा बांध अखेर फुटला आणि त्याने चक्क ट्रॅकरच्या ट्रॉली वरच उपोषण सुरु केले. शासन व प्रशासनाची मग्रूरी पहा कीं गेल्या ६ दिवसापासून अजूनही कोणत्याही अधिकारी वा पदाधिकारी यांनी या युवकाची व्यथा समजून घेण्याची औचारिकता देखील पूर्ण केली नाही.
राळेगाव तालुक्यातील मुधापूर येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल देउळकर यांचे शेतातून बेंबळा कालवा गेलेला आहे. अजुनपर्यंत त्यांच्या ७/१२ वर बेंबळा कालवाची नोंद नाही. त्या मुळे मोबदला मिळाला नाही.गेल्या सहा वर्षांपासून तो याकरीता शासकीय कार्यलयाच उंबरठा झिझवतो आहे. पण निगरगट्ट प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. संबंधित अधिकारी व भुसंपादन अधिकारी यानी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने दिनांक १० जानेवारी २०२२ पासून प्रकाश देउळकर हा शेतातच गट क. ५२/२ ब मध्ये आमरण उपोषणास बसला आहे,
प्रकाश देऊळकर यांचे शेत मोजा मुधापूर शिवारात असून त्या शेतामधुन बेंबळा कालवा गेलेला आहे. ईतर शेतकऱ्यांना बेंबळाचा लाभ मिळाला असून त्याचे या यादीमध्ये नाव नसल्यामुळे प्रकाशला कोणताही लाभ मिळाला नाही. प्रत्यक्षदर्शी बेंबळा कालवे विभागाचे अधिकारी येवून पंचानामा करून तसेच अनेक प्रकारच्या याबाबत तक्रारी केल्या आहे. सदर शेतामध्ये उपोषणकर्त्याची वहिती असून ७/१२ प्रमाणे तो मालक आहे असे निवेदनात सांगण्यात आले आहे, सदर बेंबळा अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे उपोषणकरर्त्याला आजपर्यंत कोणताही लाभ मिळाला नसून. शेतातुन पंचानाम्या प्रमाणे ०.३८ आर जमीन गेली आहे. सदर शेताचा पंचनामा करून सुध्दा त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता बेंबळा कालवे विभाग यवतमाळ यांनी सुध्दा पाहणी केली आहे. परंतु तालुका कार्यालयाचे अधिकारी माल खावून गप्प बसले आहे. यामुळे यांना शेतकऱ्याचे कोणते नुकसान झाले यांना काही घेणे देणे नाही. सदर प्रकरणाची योग्य ती माहिती घेवून मला लाभ देण्यात यावा. तसेच संबंधित कामचुकार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी घेऊन उपोषणकर्ता प्रकाश देऊळकर आपल्या शेतातच ट्रॅक्टर वर आमरण उपोषणास बसला असल्याची माहीती देण्यात आली आहे, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करीत आहे.










