अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३ जानेवारी २०२२ पासून सुरू होणाऱ्या हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी १८ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे हिवाळी २०२१ परीक्षांचे नियोजन करता येणार नाही, ही बाब प्रशासनाने स्पष्ट करीत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी व भेषज शाखांच्या परीक्षा या ३ जानेवारी २०२२ पासून प्रारंभ होणार होत्या. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. मात्र, १८ डिसेंबरपासून कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. परीक्षा विभागाची नियमित कामे खोळंबली आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३८६ महाविद्यालयांमध्ये परीक्षांचे नियोजन करणे शक्य नाही. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी संपाचा ११ वा दिवस असूनही शासनस्तावर संपाबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने ३ जानेवारी २०२२ पासूनच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथोचित वेळेत जाहीर करण्यात येईल, असे परिपत्रक २८ डिसेंबर रोजी जारी केले आहे. मंत्रालयापासून तर प्राचार्यापर्यंत परीक्षा स्थगितीचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुढील हिवाळी २०२१ परीक्षांच्या तारखेची प्रतीक्षा असणार आहे.
पुढील वर्षी ३ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या हिवाळी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावर विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळेच परीक्षा स्थगितीचा निर्णय घेतला आहे. हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ