अमरावती, दि. 24 : तिवसा मतदारसंघातील वलगाव- चांदुर बाजार, यावली- व-हा यासह विविध महत्वाच्या रस्त्यांच्या सुधारणांसाठी 17 कोटी रूपयांचा निधी विधीमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर झाला आहे. त्यामुळे महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण होऊन विकासाला गती मिळेल. दळणवळणाच्या सुविधा अधिक बळकट करण्यासाठी यापुढेही आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
भक्कम पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी निर्माणकार्य सुरू असून, आवश्यक निधीसाठी पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह शासन स्तरावर पाठपुरावा होत आहे. त्यानुसार तिवसा मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांसाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी मंजूर करण्यात आला.
राज्य महामार्ग क्र. २९८ वलगाव- चांदूर बाजार रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आठ कोटी निधी मंजूर झाला आहे. तिवसा तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. 308 यावली, डवरगाव, मोझरी, व-हा रस्त्याची मजबुतीकरणासह सुधारणा करण्यासाठी एक कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. राज्य महामार्ग 308 वरील अंजनगाव काकडा, रामा साऊर, शिराळा, मोझरी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रूपये, तसेच राज्य महामार्ग 303 येथील अडगाव यावली, पिंपळविहिर, कारला, रामा या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निधीअभावी कुठलेही काम खोळंबू नये म्हणून सातत्याने पाठपुरावा होत आहे. अधिवेशनात महत्वाच्या रस्त्याच्या कामांना निधी मंजूर झाल्याने ही कामे गती घेतील. चांगले रस्ते निर्माण झाल्याने दळणवळणाची भक्कम सुविधा निर्माण होऊन विकासाला गती मिळेल. यापुढेही आवश्यक त्या कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.