गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील २९ ठिकाणांहून स्पॉट रेतीचे उत्खनन होऊ शकते, असा अहवाल महसूल विभागाने जिल्हास्तरीय समितीकडे दिला. त्यानुसार, जिल्हास्तरीय समितीकडून रेती उत्खननसाठी केवळ दोनच स्पॉट मंजूर झाले असून, २७ स्पॉट नामंजूर झाले आहेत. यामुळे तालुक्यातील रेतीमाफियांसाठी रान मोकळे झाल्याची चर्चा आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून, लाखो रुपयचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. तहसीलदारांनीपाठविलेल्या अहवालावर भूजल सर्वेक्षण विभागाचे मत घेणे आवश्यक असून, जिल्हा स्तरीय समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पर्यावरणसमितीकडून अंतिम मंजुरी मिळते. त्यानंतरच रेतीघाटांची निविदा निघते अशी प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी तळेगाव पातुर्डा व दानापूर या दोन ठिकाणच्याच रेतीघाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे उर्वरित रेतीघाटातून अवैध उत्खनन वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अडसूळ, नेर, वांगरगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, तसेच तालुक्यात विद्रुपा नदीपात्रातही अवैध उत्खनन सुरूच असल्याचे चित्र आहे.
तलाठी सर्वेक्षण प्राप्त झालेल्या माहितीनुसार २९ ठिकाणी रेतीचे उत्खनन होत असून, त्या जागी रेतींसाठा असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.
-राजेश गुरव, प्रभारी तहसीलदार, तेल्हारा.
पर्यावरण समितीने ठरवून दिलेल्या नियमानुसार स्पॉट निश्चित करण्यात आले. मात्र, सर्वेक्षणचे आदेश मिळाल्यास सर्वेक्षण करण्यात येईल.
- पी.बी. इंगळे, कनिष्ठ भूवैज्ञानिक, सर्वेक्षण विभाग, अकोला.
रेतीचे स्पॉट लिलावामधून सुटले असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने भूजल व महसूल तसेच गौण खनिज यांच्या संयुक्त समितीद्वारे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल.
-टी. आर. चापले, जिल्हा गौण खनिज अधिकारी, अकोला.
या गावांचा पाठविला अहवाल
तालुक्यातील २९ गावांतील रेतीचे उत्खनन होऊ शकणारे स्पॉटचा अहवाल तहसीलदारांनी वरिष्ठांकडे पाठविला. त्यामध्ये मनब्दा, उबारखेड, मनात्री, नेर, सांगवी, तळेगाव डवला, पातुर्डा, वडनेर, अडसूळ, वांगरगाव, उमरी, बाभूळगाव, तळेगाव खुर्द, तळेगाव बु., हिवरखेड, अडगाव, शिरसोली, गोर्धा, भोकर, दानापूर, चितलवाडी, सदरपूर, वारखेड, निंभोरा, अकोली या गावांचा समावेश आहे.










