महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.७:- शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य ठेवत स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा भद्रावती नगर परिषदेने दोनदा पुरस्कार प्राप्त केला असून भद्रावती शहराचा नावलौकिक संपूर्ण देशात वाढविला हे सर्व नगर परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. यापुढे नगर परिषद भविष्यात होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या फाइव स्टार मानांकनासाठी स्पर्धेत उतरणार आहे. त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2021 मध्ये पश्चिम झोनमधील पाच राज्यातून भद्रावती नगर परिषदेने ‘ब’ वर्ग गटातून व पन्नास हजार ते एक लक्ष लोकसंख्या असलेल्या शहरातून प्रथम क्रमांक पटकविला. याचे औचित्य साधत शहरातील घनकचरा प्रकल्पात पालिकेतर्फे स्पर्धेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष बामणे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, सुधीर सातपुते, प्रफुल्ल चटकी, नगरसेविका जयश्री दातारकर, स्वच्छतादूत भय्याजी मिरगे आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभात पालिकेतील कर्मचारी, पत्रकार, ठेकेदार यांचा भेटवस्तू तथा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पात निर्मित केलेले खत भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांना नगर परिषदेतर्फे मागील काही वर्षापासून शहरातील स्वच्छता अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती एका चित्रफितीद्वारे देण्यात आली. तर भविष्यात होऊ घातलेल्या फाइव स्टार मानांकन याबाबत नागरिकांनी काय काय सहकार्य करावे याबाबतही माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर यांनी, संचालन रवींद्र गड्डमवार यांनी केले. तर आभार नगरसेवक सुधीर सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व सफाई कर्मचारी उपस्थित होते.