अमरावती : पगारवाढीनंतर शासनाने कामावर परतण्याची सूचना केली तरीही जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून, शुक्रवार ३ रोजी ६ चालकांची सेवा कामस्वरूपी समाप्त केली आहे. अमरावती एसटी विभागात २४०० कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी आजवर २८१ कर्मचारी कामावर परतले. तर ३८७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित कर्मचारी जर तत्काळ कामावर परतले तर त्यांचे निलंबन परत घेतले जाणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली. विलिणीकरणाच्या मागणीवर अडून असलेले २ हजार ११९ कर्मचारी अजुनही संपावर आहेत. त्यापैकी ६ चालकांची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली असून त्यांना परत कामावर घेतले जाणार नसल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असून ते कोणत्याही स्थितीत माघार घेण्यास तयार नाहीत. जे चालक-वाहक कामावर परतले त्यांच्याकडून काही बस फेऱ्या होत आहेत. मात्र अजुनही राज्यभरातील तसेॉच विभागातील ८५ टक्के कर्मचारी संपावरच असल्याने ‘लाल परी’ची चाके रखडली आहेत.
परत कामावर घेणार नाही
अमरावती जिल्ह्यातील सहा एसटी चालकांची सेवा कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली असून त्यांना आता कामावर घेतले जाणार नाही. – श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक, एसटी अमरावती.











