अकोला : महावितरणच्या वीजग्राहकांकडे ७१ ५७८ कोटीची थकबाकी आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी थकीत देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल म्हणजे नागरिकांवर ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी घेतलीच नाही तर वीजबिल, विजेचे शुल्क भरण्याचा प्रश्नच नाही. वीजजोडणी घेतल्यानंतरही विजेचा वापर केला नाही तर स्थिर आकाराशिवाय जादा पैसे भरावे लागत नाही. त्यामुळे अत्यावश्यक विजेचा वापर आपणाकडून होताना त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीजबिल आहे व ते दरमहा भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. ना नफा, ना तोटा तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च,विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रूपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे ७१,५७८ कोटीची थकबाकी आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. घरगुती, उद्योग, शेती, व्यवसाय, सार्वजनिक सेवा आदींसाठी वापरलेल्या विजेसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे महावितरणकडून बिलांची आकारणी केली जाते. या दराप्रमाणे महावितरणकडून बिलांची आकारणी केली जाते व ग्राहकांकडून वापरलेल्या विजेनुसार बिलांचा भरणा केला जातो. मात्र यापूर्वी कधी नव्हे अशी वीजबिलांची थकबाकी व विविध देणींच्या दायित्वाचे आर्थिक ओझे असल्याने सद्यस्थितीत बिलांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे थकीत वीज देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. अन्यथा थकीत देयकाचा भरणा न केल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाईल,असा इशारा देण्यात आला आहे.











