वाशिम दि.22 : पोलीस आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीबाबत किती दक्ष राहून काम करतात याची प्रचिती 18 नोव्हेंबर 2021 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाला कारंजा येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ई-मेलवरुन आली. सविस्तर माहिती अशी की, कारंजा येथे इयत्ता 9 वीत शिक्षण घेणाऱ्या एका मुलीच्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्ती तिला वारंवार फोन करुन तसेच व्हिडिओ कॉल करून त्रास देत होता.या मुलीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविलेल्या ई-मेलवर या घटनेची माहिती दिली. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तात्काळ मुलीच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिस यंत्रणा या कामी लावली. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या कारंजा येथील निर्भया पथकाला तात्काळ सुचना करून या मुलीच्या मदतीसाठी जाण्याचे सांगितले. कारंजा येथील निर्भया पथक तात्काळ मुलीच्या घरी पोहचले. मुलीच्या घरी पोहोचताच तिची तक्रार समजून घेतली.सायबर सेल वाशिमकडून त्या मुलीला ज्या मोबाईल क्रमांकावरुन कॉल येत होता, त्याचे लोकेशन घेऊन व त्या क्रमांकावर संपर्क करून शहानिशा केली. त्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन हे गुजरात राज्यातील पिपोदरा येथील होते.अनोळखी व्यक्तीला ज्या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा होता, तो क्रमांक आणि कारंजा येथील नववीत शिकणाऱ्या मुलीच्या मोबाईल क्रमांकातील आकडे हे थोडेफार सारखेच असल्याने त्याच्याकडून चुकून कॉल लागल्याबाबत त्या अनोळखी व्यक्तीने सांगितले.परत सदर मोबाईलवर कॉल करणार नाही याबाबतची हमी त्या अनोळखी व्यक्तीने पोलिसांशी झालेल्या भ्रमणध्वनी संवादातून दिली. अनोळखी व्यक्ती व त्याच्या लोकेशनबाबतची माहिती कारंजा येथील निर्भया पथकाने मुलीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना दिली.आपल्या मुलीने पोलीस अधीक्षक कार्यालयाला केलेल्या एका ई-मेलची वाशिम पोलीस दलाने तात्काळ दखल घेऊन मदत करून मुलीच्या घरी जाऊन तक्रारीचे निरसन केले.त्याबद्दल मुलीने व तिच्या आईवडिलांनी अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे पोलिसांनी आम्हाला मदत केल्याची भावना व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात कारंजा (ग्रामीण) पोलीस निरीक्षक श्री.धंदर,पोलीस उपनिरीक्षक श्री.धोंगडे,श्री.अंभोरे,पोलीस हवालदार महेंद्र रजोदिया व टीमने केली. वाशिम पोलीस दल निर्भया पथक यांनी आवाहन केले असून जर कोणी व्यक्ती महिला व मुलींना त्रास देत असेल,पाठलाग करीत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाईन नंबर 100 किंवा 112 तसेच वाशिम नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधून माहिती द्यावी.माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.असे वाशिम पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कळविले आहे.