दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
जालना, दि.12 अवैध वाळूउपसाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे संतप्त झालेल्या वाळूमाफियाने गुंडासह जाफराबाद येथील दै. पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा जाहिर निषेध करत हल्लेखोर वाळूमाफिया आणि गुंडांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याद्वारे कठाेर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांनी जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणचा अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीबाबत वस्तुनिष्ठ लेखन केले आहे. यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने वाळू माफियांनी पाबळे यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पाबळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली असल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


