अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव दि.13 तालुक्यातील मेडशी ते डव्हा पालखी रस्त्याचे कामाचे भिजत घोगळे पडले असून कंपनीच्या वेळ खाऊ धोरणाने रस्ता कामाची पुरती वाट लागली आहे.मेडशी येथील मोर्णा नदीवरील पूल तोडल्याने दळणवळण ठप्प झाले तर 3 महिन्यासाठी एका शेतकऱ्याच्या शेतातून रस्त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आता मात्र पाऊसामुळे सदर शेतकऱ्यांची शेती खरडून जाण्याची भीती असल्याने त्यांनी शेतात नाली खोदकाम करणार असल्याचे सांगितल्याने रस्त्या अभावी शेतकऱ्यांचा पेरणी चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दमदार पाऊस झाल्यास बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती खरडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मेडशी ते डव्हा पालखी रस्त्याचे काम 2 वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर कामाचे कंत्राट नागपूर येथील कंपनीला देण्यात आले आहे. पालखी रस्ता प्रकल्प करोडो रुपयांचा असल्याने त्यासाठी अन्य कंत्राटदाराना टप्प्या टप्प्याने काम दिले जात आहे. सदर काम पूर्णत्वास जाण्यास अडचणी येत आहेत. नवीन पुलं निर्मितीची डिझाईन तयार नसतांनाच कंत्राटदाराने मेडशी ते डव्हा पालखी रस्त्याला जोडणारा मोर्ना नदीवरील पुल तोडण्याचे काम जानेवारी महिन्यातच केले. मार्च पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे शेतकरी रहेमान गौरे यांना सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःच्या शेतातून तात्पुरती रस्त्यासाठी सहमती दर्शविल्याने कास्तकारांना मशागतीची कामे पूर्ण करता आली. आता मात्र पावसाळा लागल्याने सदर शेतकऱ्यांची शेती खरडून जाण्याचा धोका वाढला आहे. त्यांनी नाला खोदण्याची तयारी सुरू केली केली असल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे .पुल प्रकरणावरून शेतकरी आक्रमक झाले असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लवकर लवकरात पुलाचे काम सुरू करावे जेणे करून नदी पलीकडील शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचं प्रश्न सुटेल अशी मागणी येथील शेतकरी शेख रजाक भाई यांनी केली आहे.











