मुंबई – राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले.
कोविड टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील व्यक्तींशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत चर्चा केली.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत. मात्र नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. अनेक कलाकारांनी नाट्य निर्मात्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली होती.
नाटककार अतुल पेठे यांनी सोशल मिडियावर लिहिले होते, “निर्बंध आम्ही मान्य केले आहेतच पण मग अनिर्बंधांबाबत धोरण काय ? कायदा आम्हाला मान्य पण बेकायदा वागणाऱ्यांवर कारवाई काय ? बंदिस्त जागा हा प्रश्न असेल तर बार, विमान, ऑफिसे आणि नाट्यगृहातील राजकीय कार्यक्रम सुरू का ? नाटकवाल्यांना कायदा वेगळा आहे की सर्वांना समान ? कोरोना सर्वांमुळे होतो की फक्त नाटकवाल्यांमुळे ? आम्हाला वाकुल्या दाखवून अनिर्बंध ‘अपशब्दांची रोजनिशी’ लिहीत सुटलेल्या सर्व वाळवीग्रस्त व्यवस्थांना सलाम.”
या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत असल्याचे अनेक कलाकारांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. राज्य शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यात कलाकर व या क्षेत्राशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात ठिकठिकाणी आंदोलने केली होती.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात आली नाही. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात कलाकारांनी नटराजाची महाआरती केली होती. आंदोलनाचा भाग म्हणून जागर आणि गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, सुरेखा कुडची असे कलाकार त्यावेळी उपस्थित होते.