पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
औसा लातुर : औसा तालुक्यातील शिवली येथील संगणक अभियंता तरुणीने आपले पहिले वेतन स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या गावातील तरुणांसाठी देवून युवापिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याला उजाळा देणारा रक्षाबंधनाचा सण सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीला भेट देतो अशी पद्धत आहे. याच सणाचे औचित्य साधून शिवली येथील नुकतीच आय टी इंजिनियर बनलेल्या प्राजक्ता विरभद्र नागराळे या तरुणीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या गावातील हुशार, होतकरू, शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील विद्यार्थ्याना परीक्षेसाठी लागणा-या पुस्तकांचे वाटप केले आहे. त्यामुळे इंजिनिअर बनलेल्या बहिणीकडून गावातील बहिण भावांना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली आहे. प्राजक्ता विरभद्र नागराळे ही टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस या नामांकित कंपनीत आय. टी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक द्रष्ट्या दुर्बल घटकातील तरुण तरुणींना महागडी बनत चाललेली शैक्षणिक वाटचाल करणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना त्यांची ध्येय गाठणे अशक्य होत आहे. या द्रष्टिकोनातून नौकरीतून मिळालेल्या पहिल्या वेतनाची रक्कम गावातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना फायदा होईल असे काहीतरी करण्याची प्राजक्ताची इच्छा होती. त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुस्तके भेट देण्यात आली. या प्रसंगी औसा पंचायत समितीच्या माजी उपसभापती रेखा नागराळे, शिवकुमार नागराळे, शिवलीचे सरपंच सुधाकर खडके, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलिस कॉन्सटेबल काकासाहेब बोचरे यांच्यासह गावातील विद्यार्थी उपस्थित होते .