अकोला, दि.९(जिमाका)- राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. अकोला येथे यंदाही प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात रानभाज्या महोत्सव आज आयोजित करण्यात आला. या महोत्सवास अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मुक्त हस्ते खरेदी केल्याने महोत्सवात ४५ हजार रुपयांची रानभाज्यांची विक्री झाली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ. विठ्ठल वाघ, प्रभारी कृषी उपसंचालक संध्या करवा, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक दिनकर प्रधान, प्रकल्प संचालक डॉ के.बी.खोत,अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तेराणीया, तालुका कृषी अधिकारी दिनकर प्रधान, तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार यांची उपस्थिती होती.
रानभाज्या ह्या आहाराचे पोषणमूल्य वाढवणाऱ्या असतात. तसेच त्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असतात,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी केले. तसेच शासनाच्या आत्मा, महिला बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या संस्थांनी बचत गटांमार्फत शेतीमाल विक्रीसाठी प्रयत्न करायला हवे,असेही सांगितले.
कोरोना नियमांचे पालन करुन आयोजन
कोरोनाच्या संकटात शहरातील नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवावी याची जाणीव झाली असून या महोत्सवात येणाऱ्या रानभाज्या या नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. कृषी विभागाच्या आत्मा यंत्राच्या वतीने आयोजीत करण्यात आले होते. संपूर्ण निर्जंतुक केलेल्या परिसरात योग्य शारीरिक अंतर ठेवून १२ स्टॉल्स उभारण्यात आले होते.
रानभाज्यांचे २० हून अधिक प्रकार उपलब्ध
यामहोत्सवात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, अंबाडी, केना, करवंद, चमकुराचे पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबटचुका, वाघाटे, गवती चहा, गोबरु कंद, तांदळजा, सुरण कंद, कुर्डु, गुळवेल, शेवगा आदींसह २० हून अधिक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होत्या. ‘आत्मा’ अंतर्गत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रानभाज्या खरेदी केल्या. या महोस्तवात उभारण्यात आलेल्या १२ स्टॉल्सवरुन अकोलेकरांनी ४५ हजारांचा भाजीपाला खरेदी केला,अशी माहिती ‘आत्मा’ सुत्रांनी दिली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी व्ही.एम शेगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख, सचिन गायगोळ, वरुण दळवी, अर्चना पेठे, संदीप गवई,राहुल अडाणी, दीपक मोगरे,यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कृषी पर्यवेक्षक अनंत देशमुख यांनी केले.