बाबासाहेब खरात
तालुका प्रतिनिधी अंबड
अंबड : सज्ञान वय असलेले तरुण तरुणी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून कायदेशीर लग्न करून पोलिसांच्या भीतीने पळून गेले होते. मुलीच्या वडिलांनी मुलीची missing Complaint केल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते फकिरा वाघ, जालना यांनी कदीम जालना पोलीस स्टेशन येथील पोलिसांना सर्व सहकार्य करून मुलाचे आई-वडील व भाऊ यांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावून घेतले. पोलिसांना तापसकामी संपूर्ण सहकार्य करूनही पोलीस निरीक्षक (PI) प्रशांत महाजन व इतर पोलीस कर्मचारी यांनी मुलाचे वडील, भाऊ व इतर नातेवाईकांना अमानुषपणे व बेकायदेशीरपणे बेदम मारहाण केली. महिलांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली व तूमच्या सर्व खानदानाला मारिन अशा धमक्या दिल्या. तुम्हाला एसपी, आईजी, डिजी कुणाकडे जायचे ते जा माझं कोणीच काही करू शकत नाही अशा धमक्या दिल्या. दुसऱ्या दिवशी नवविवाहित तरुण-तरुणी पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांनी लग्न झाल्याचे सर्व कागदपत्रे सादर केली असतानादेखील सर्वांनी मिळून मुलास बेदम मारहाण केली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी जबाब बदलण्यासाठी मुलीस मारहाण केली. मुलीची महिला पोलिसाने चौकशी करणे अपेक्षित असताना पुरुष PI महाजन यांनी महिलेस मारहाण करून तिचा अवमान केला व त्यानंतर इतर पोलिसांनी देखील मुलीस मारहाण केली. प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांना सांगितले असता त्यांनी देखील बेकायदेशीर मारहाणीचे समर्थन करून कदीम जालना पोलीस स्टेशनच्या पीआय व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लग्न केलेल्या तरुणांच्या आईवडिलांना व नातेवाईकांना मारहाण करणे व शिवीगाळ करणे, नवविवाहित महिला तरुणीशी मारहाण व शिवीगाळ करणे या बेकायदेशीर वर्तनाबाबत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.