पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
लातूर जिल्हयातील लातूर, औसा व देवणी तालुक्यातील पशुपालकांच्या पशुधनास वेळेत आरोग्याच्या सेवा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री पशुस्वस्थ्य योजेनेतंर्गत फिरता पशुचिकित्सा दवाखाना तीन व्हॅनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. मात्र या यंत्रणेला वेळेत निधी मिळत नसल्यामुळे फिरता पशुचिकित्सा दवाखाना कार्यरत ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मात्र दमछाक होत आहे.
मुख्यमंत्री पशुस्वस्थ्य योजेनेतंर्गत लातूर जिल्हयातील लातूर, औसा व देवणी तालुक्यात फिरता पशुचिकित्सा दवाखाना तीन व्हॅनच्या माध्यमातून दि. २० फेबु्रवारी पासून सुरू करण्यात आला. पशुपालकांचे पशुधन आजारी पडल्यास त्या पशुधनावर उपचार करण्यासाठी १९६२ या टोल फी नंबरवर फोन केल्यास त्यांना या फिरत्या पशुचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून उपचार वेळेत उपलब्ध होतात. अथवा त्या परिसरातील पशुचिकित्सालयात उपचार करण्यात येतात. आज पर्यंत १९६२ या टोल फी नंबरवर ६४ पशुपालकांनी फोन करून आपल्या पशुधनावर उपचार करून घेतले आहेत.
पशुचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून पशुधनावर औषधोपचार, कृत्रिम रेतन, वंधत्व निदान व उपचार, प्रथमोपचार सुक्ष्मदर्शक यंत्राद्वारे रोगाचे निदान करून केले जात आहेत. तसेच पशुधनास विषबाधा, संर्पदंश, जखमा झाल्या आसल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची सोय आहे. एखाद्या पशुधनात कॅलीशियम कमी झाल्यामुळे उठता येत नसल्यास त्यासाठी सयंत्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर, औसा व देवणी तालुक्यात फिरत्या पशुचिकित्सालयासाठी काम करणा-या ड्रायव्हरला महिण्याला १५ मानधन देणे आवश्यक आहे. मात्र त्यांना एप्रिल पासून आजपर्यत मानधन मिळाले नाही. इंधनासाठी प्रतिगाडी महिना १० हजार रूपये येणे आवश्यक असताना आज पर्यंत केवळ १० हजार रूपये आले आहेत. औषधी खरेदीसाठी प्रतिमाहा १० हजार रूपये तीन गाडयांसाठी आवश्यक असताना मार्च पासून प्रतिगाडी आज पर्यत १६ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या यंत्रणेत सातत्य ठेवण्यासाठी आर्थिक चनचन जाणवत आहे. ती दूर होणे आवश्यक आहे.
१९६२ या टोल फी नंबरवर फोन करून पशुपालकांनी लाभ घ्यावा
लातूर, औसा व देवणी तालुक्यात पशुधनाच्या आरोग्याच्या सोयीसाठी तीन फिरते पशुचिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. ही सेवा सुरूळीत होत आहे. आजपर्यंत लातूर तालुक्यातील ५, औसा १५ व देवणी तालुक्यातील १४ पशुपालकांनी १९६२ या टोल फी नंबरवर फोन करून या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनास कांही आजार असल्यास १९६२ या टोल फी नंबरवर फोन करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले.
पशुचिकित्सालयांची यंत्रणा सक्षम होणे आवश्यक
फिरत्या पशुचिकित्सालयांची सेवा पशुपालकांना सक्षम देण्यासाठी पदवीधर डॉक्टरांची आवश्यकता आहे. तसेच या यंत्रणेला निधीचा पुरवठा नियमित होणे आवश्यक आहे. तरच या यंत्रणेत सातत्य राहणार आहे. आजपर्यंत फिरत्या पशुचिकित्सा व्हॅनच्या माध्यमातून ३ शिबिरे घेवून ४ हजार १८४ पशुधनावर औषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच ७० कृत्रिम रेतन, १९८ गर्भ तपासणी करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नानासाहेब कदम यांनी दिली.