अकोला,दि.7(जिमाका)- शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 3 ऑगस्ट रोजी निर्बंध शिथीलतेबाबतचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशात अंशत: बदल करुन बार रेस्टॉरेन्ट व मद्यविक्रीच्या वेळेत बदल करुन सुधारित आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशात म्हटल्यानुसार, बार रेस्टॉरन्ट सोमवार ते शुक्रवार सुरु होण्याच्या विहीत वेळेपासून दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह सुरु राहतील, तसेच शनिवारी सुरु होण्याचे विहीत वेळेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह सुरु राहतील व रविवारी पुर्णत: बंद राहतील.
तसेच उर्वरित सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेनुसार सुरु होवून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवारी विहीत वेळेला सुरु होवून दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णपणे बंद राहतील. हे आदेश शनिवार दि.7 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशात म्हटले आहे.