राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यातील कलगाव येथील शिक्षक जमीर खान हमीद खान वय वर्षे 54 यांचे अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. मनमिळावू आणि सहकार्यशील वृत्तीच्या जमीर खान यांच्या अशा अचानक जाण्याने सारे गाव हळहळले असून गरीबांचा आधारवड गेल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. नुकतीच रमजान ईद झाल्याने ते ईद निमित्त दिनांक मंगळवार एक एप्रिल रोजी आपल्या सासरी पुसद येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. सायंकाळची मगरिबची नमाज अदा करण्यासाठी ते मशिदीत गेले असता नमाज पढतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला अन् ते तिथेच कोसळले. तिथेच त्यांना मृत्यू आला. जमीर खान हे कलगाव येथील वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल येथे शारीरिक शिक्षण शिक्षक होते. त्यांच्या मृदु आणि सहकार्यशील स्वभावाने ते आपल्या सहकारी शिक्षक आणि गावात सहकार्य तत्पर व्यक्ती म्हणून परिचित होते. अडल्या नडल्या व्यक्तीला मदत करणे, शासकीय कामात, योजनांची कागदपत्रे काढून देण्यात ते दिव्यांग, वृद्ध, महिला, निराधार व मागासांना नेहमी मदत करायचे. त्यांनी गावातील अनेक निराधारांना बाल संगोपन योजनेचा फायदा मिळवून दिला. प्रसंगी स्वखर्चाने यवतमाळला जाऊन ते अर्ज जमा करून येत. त्यामुळे अनेक अनाथ आज मासिक पगार घेत आहेत.निराधार, श्रावण बाळ योजनेचे अनेक गरजूंचे अर्ज स्वतः दिग्रस तहसील कार्यालयात जमा करून दिले. अनेकांचे राशन कार्ड तयार करून देण्यास हातभार लावला. कलगाव येथीलच शिखरे नामक गृहस्थाच्या अनाथ मुलांना स्वतः गाडी खर्च करून होस्टेलमध्ये दाखल केले. त्यांच्या दर महा खर्चाची व्यवस्था केली. आपल्या अनेक नातेवाईकांना रोजगार लावून दिले. समाजातील मुलींची लग्न जुळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे. शिवाय गावातील लग्नकार्यात पाहुण्यांच्या व्यवस्थेसाठी जातीने हजर असायचे. शाळेसाठी 24 तास उपलब्ध असायचे. अशाप्रकारे विद्यार्थी, समाज आणि गावात ते सर्वांना प्रिय होते. त्यांच्या अशा जाण्याने सर्वांना धक्काच बसला असून त्यांच्या मृत्यूची बातमी गावात कळताच अनेक घरी चुली पेटल्या नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, दोन भाऊ, चार बहिणी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता कलगाव येथील मुस्लिम कब्रस्थान येथे त्यांना सुपुर्दे खाक करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला खूप मोठा जनसमुदाय हजर होता.


