सुधीर घाटाळ
ग्रामीण प्रतिनिधी डहाणू
पालघर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, बहुजन विकास आघाडी, उद्धव ठाकरे गट (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा धक्का बसला आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली (२७ फेब्रुवारी) शिवसेना जनसंपर्क कार्यालय, पालघर येथे शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.डहाणू तालुक्यातील पालघर मतदारसंघाच्या तीन गटातील गंजाड, निकणे, भराड, ओसरवीरा, धानिवरी आणि कांदरवाडी या गावांमधील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला. गंजाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अभिजीत देसक, प्रभारी सरपंच कौशल कामडी, ओसरवीरा ग्रामपंचायतीचे सरपंच व मनसे तालुका अध्यक्ष नरेश कोरडा, धानिवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा, उबाठाचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ, निकणे उपसरपंच सुदाम मेरे, गंजाड तंटामुक्त अध्यक्ष प्रविण वरठा, ग्रामपंचायत सदस्य विनोद गडग, कल्पेश ठाकरे, कैलास दळवी, काशी वायेडा, मनिषा कोद्या, अनिता कोठारी, रायतळी ग्रामपंचायत सदस्य जिगर भोनर यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचा (शिंदे गट) जिल्ह्यात प्रभाव वाढत आहे. विशेषतः डहाणू आणि आसपासच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा मोठा ओढा शिंदे गटाकडे दिसून येत आहे. पक्षाच्या माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, महिला आघाडी प्रमुख वैदेही वाढाण, प्रदेश प्रवक्ते केदार काळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.या घडामोडींमुळे मनसे, बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या संघटनात्मक बळावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात मजबूत संघटन उभं राहत असल्याने पक्षाला मोठं यश मिळू शकतं, असे जाणकारांचे मत आहे.


