मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावात ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे जवान भारतमातेचं भूषण असतात. अशा सैनिकांचा सर्वांनाच अभिमान असतो.भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले वाकलघरचे सुपुत्र पॅरा कमांडो सचिन सावंत,सुभेदार परशुराम कडू,दांडगुरी गावचे सुपुत्र सुभेदार भरत सावंत,हवालदार मोहन सावंत हे आपला सेवा कार्यकाळ पूर्ण करुन निवृत्त झाले. गावच्या सुपुत्रांनी आपल्या भारत मातेचं रक्षण केल्याचा सार्थ अभिमान असल्यानं आणि त्यांचा आदर्श आजच्या नव्या उमेदीच्या तरुणाईने घ्यावा.त्याबरोबरच सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.दांडगुरी गावच्या प्रवेशद्वारापासून ते वाकलघर गावच्या होळीच्या मैदानापर्यंत सजवलेल्या जीपमधून लेझीम आणि संगीताच्या तालावर पुष्प वर्षावात काढण्यात आलेल्या या मिरवणूकीत गावातील अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.वाकलघर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं अध्यक्ष श्रीधर शेलार,सरपंच शालिनी कदम यांच्या हस्ते या सैनिकांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना श्रीधर शेलार यांनी सांगितलं की या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सैनिकांच्या माता, पीता,भगिनी आणि त्यांच्या सहचारीणी यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही भाग्यवान आहात,देशसेवा करून निवृत्त झालेले सैनिक आज आपल्या कुटुंबासोबत मांडीला मांडी लावून बसलेत यापेक्षा मोठा आनंद तो काय? विपरीत परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या या निवृत्त सैनिकांच्या सत्कार सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवण्याचा आणि त्यांचा सत्कार करण्याचा मान दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो व या सैनिकांचं उर्वरित आयुष्य आनंदाने जावो अशी ग्रामदेवते चरणी प्रार्थना करतो.यावेळी वाकलघर गावचे माजी दिवंगत सैनिक पांडुरंग धांदरुत, गोपीनाथ राऊत,पांडुरंग कडू, विठ्ठल जाधव,सिताराम कडू, अनंत सखाराम शेलार यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्याबरोबर नुकतेच निधन झालेले भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.हा सोहळा डोळ्यात साठवताना वीर जवानांच्या लढाऊ बाण्याचा वारसा सांगणाऱ्या वाकलघर आणि दांडगुरी गावची प्रत्येक माता भगिनी या निवृत्त जवानांमध्ये आपल्या मुलाचं प्रतिबिंब पाहून सुखावली होती.या समारंभाला वाकलघर मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल चव्हाण,महिला अध्यक्ष रुपाली शेलार,पोलीस पाटील रघुनाथ शिंदे,माजी सरपंच अनंत गुजर,वसंत राऊत वाकलघर ग्रामस्थ मंडळाचे विविध पदाधिकारी त्याचबरोबर दांडगुरी,आसुफ,खुजारे,वावे, नागलोली,देवखोल,बोर्ले या गावातील विविध मान्यवर पदाधिकारी,ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.काही अपरिहार्य कारणामुळे वाकलघर गावचा सेवानिवृत्त जवान आदेश ओमले हा या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.आपल्याच गावानं आपला केलेला सन्मान यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद झाला असून या सन्मानाने आम्ही भारावून गेलो आहोत अशा आपल्या भावना सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केल्या.या समारंभाचं सूत्रसंचालन संतोष भोगल यांनी तर आभार प्रदर्शन संदेश गुजर यांनी केलं.

