रत्नागिरी, दि.29 :- महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली.
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.
कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्याने तेथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डॉ. राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधताना म्हटले.
रत्नागिरी जिल्ह्यात दि. 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर आल्याने महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिले.
चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.
या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. आपल्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1 हजार 942 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात 7 लाख 53 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.
पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1 हजार 617 गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 11 हजार 368 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 404 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 56 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या दौऱ्यात महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, महावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झालटे, महापारेषणचे कराड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषणच्या अधीक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते.