बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागपूर प्रदेशिक हवामान खात्याने आज विदर्भतील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट केला होता. त्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. हवामान विभागातर्फे आजपासून पुढील ५ दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी आज सुखावला आहे. तसेच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे. वाशिममधील अनेक भागांत आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे शेतीत पेरलेल्या बियाणांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच खरिपांच्या बियाणांची पेरणी केली होती. पण मुसळधार पावसामुळे सर्व बियाणे वाहून गेली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाशिममधील शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात आज दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे नेर तालुक्यातील फकिरजी महाराज मंदिराजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला. तसेच परिसरातील शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. भंडारा जिल्ह्यात देखील काल संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरीस लावली. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पाऊस बरसला. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.