मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : येथे मागील दहा दिवसात ०९ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सरकारी बाबूंमध्ये लाचखोरीची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. वाढत्या तक्रारी पाहता बीड एसीबी कार्यालयाला शेजारील जिल्ह्याची मदत घ्यावी लागत असल्याचे शुक्रवारी झालेल्या कारवाईतून दिसून आले. ही जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना झाल्याची चर्चा नागरिकांमधून करण्यात येत आहे. हे चित्र पाहता जिल्ह्यातील कर्मचाऱ्यावर लाचखोरीचा काळा डाग लागला असून, इमानेइतबारे काम करणाऱ्यांकडे सर्वसामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. बीड जिल्ह्याला नेहमीच महाराष्ट्रातील बिहार म्हणून बदनाम करणारे कमी नाहीत. त्यात आता सरकारी बाबूंनी हातभार लावत लाचखोरांचा जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करून देण्याचे काम केले. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, मागील दहा दिवसात एकूण ०९ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक आणि पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंत्याचा समावेश आहे. तर इतर कर्मचारी आहेत, या सर्व घटना ताज्या असतानाही राज्य परिवहन महामंडळाचा कामगार अधिकारी दिनेश बाबुलाल राठोड यास चालकाकडून ३० हजाराची लाच स्वीकारताना उस्मानाबाद / धाराशिव एसीबी पथकाने दि.२४ मे २०२४ शुक्रवार रोजी रंगेहात पकडले आहे. ही १० व्या दिवसातील ०९ वी कारवाई आहे. अधिक तक्रारी असल्याने कामाचा ताण आल्यामुळे बीड एसीबी कार्यालयाला चक्क उस्मानाबाद /धाराशिव एसीबी पथकाची मदत घ्यावी लागली. यामुळे जिल्ह्यातील लाचखोरीचा उच्चांक किती झाला हे दिसून येते. हे चित्र बदलण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमके काय पावले उचलणार आहेत याची उत्सुकता जिल्ह्यातील जनतेला लागली आहे.