एकाच शाळेचे 30 विद्यार्थी पात्र होणारी परळी तालुक्यातील एकमेव शाळा
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि: ०८ मे २०२४ शहरातील श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असते. संस्कार प्राथमिक शाळा ही परळी शहरातील एकमेव अशी शाळा आहे जी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असते. आजपर्यंत शाळेने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या, कलेच्या, तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नाव विविध स्तरांवर उंचावण्याचे कार्य केले आहे. त्याचाच एक भाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने १८ फेब्रुवारी २०२४ ला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करुन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावण्याचे कार्य केले आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कार प्राथमिक शाळेचे एकूण ३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परळी तालुक्यातील इतिहासात नोंद घ्यावी अशी कामगिरी शाळेने केलेली आहे. असे यश संपादन करणारी संस्कार प्राथमिक शाळा ही परळी तालुक्यातील एकमेव शाळा ठरली आहे. संस्थेचे सचिव श्री. दीपक तांदळे सर यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विनामूल्य जादा तासिका घेण्यात आल्या होत्या, तसेच शिकवलेल्या प्रत्येक घटकावर दर रविवारी परीक्षा, दररोजचा गृहपाठ, अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी शाळा स्तरावर घेतलेल्या सराव परीक्षा, या सर्व गोष्टींमुळे शाळेने दैदिप्यमान यश संपादित केले आहे. शाळेचे उत्तम नियोजन व शिक्षकांचे सातत्यपुर्ण मेहनत हेच या यशाचे गमक आहे. या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचे पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास तांदळे सर, सचिव श्री. दीपक तांदळे सर, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अनकाडे सर, शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री. अमरशील गायकवाड सर, पर्यवेक्षक श्री. इंगळे सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व पालक वर्गातून विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.


