दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार – १९७१ मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धात भारताने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवून १६ डिसेंबरला डौलाने तिरंगा फडकवला होता.या १६ डिसेंबरला संपूर्ण देशभरात विजयी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या विजयी दिनाचे औचित्य साधत जनजाती विकास मंच,जव्हार आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने जव्हारच्या के.व्ही हायस्कूल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा निवृत्त ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव यांच्या हस्ते अनोखा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले.या सेवानिवृत्त सैनिकांच्या सन्मान सोहळ्याला तालुक्यातील १७ शाळा व कॉलेजच्या जवळपास ३५० युवकांनी आपला सहभाग नोंदवून केंद्र शासनाच्या ‘अग्निपथ’ या महत्त्वकांक्षी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.या सोहळ्यात सेवानिवृत्त सैनिक शंकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तालुक्यात आतापर्यंत माजी सैनिकांचा होणारा हा पहिला सन्मान असून त्यांनी देशसेवा करतानाचे अनुभव सांगताना त्यांची छाती अगदी गर्वाने फुलून आली होती तर विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले निवृत्त ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव यांनी अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती सांगून युवकांनी या योजनेत सहभागी होऊन ‘अग्नीवीर’ बनण्या विषयी मोलाची माहिती दिली.दरम्यान निवृत्त ब्रिगेडियर यांचे आगमन होतात सेवानिवृत्त सैनिकांनी त्यांना सलामी देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शक व सेवानिवृत्त सैनिकांचे उपस्थित महिलांनी औक्षण करत त्यांनी सभागृहात प्रवेश केला.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री रमेश देसाई,जनजाती विकास मंचाचे पालघर जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन संदीप कनोजा यांनी केले तर राजेश कोरडा यांच्या आभार प्रदर्शनिय मनोगतने कार्यक्रमाची सांगता झाली.











