मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि:१६ डिसेंबर २०२३ परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न परळीतील नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे विद्यार्थी करीत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडिओसह चित्रण करीत परीक्षार्थींचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सध्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा सुरू आहेत.दरम्यान बीड जिल्ह्यात देखील विद्यापीठाशी सलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येत आहे.असे असताना परळी येथील नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात मोबाईल समोर ठेवूनच विद्यार्थी कॉपी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेचा भांडाफोड करण्यासाठी एका सहकेंद्रप्रमुखाने कॉपीच्या घटनेचं व्हिडिओसह चित्रण देखील केले.मात्र संबंधित विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्यावर कार्यवाही न करता हा प्रकार समोर आणणाऱ्या सहकेंद्रप्रमुखाचीच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकाने तडकाफडकी बदली केली आहे.हा सर्व प्रकार कुलगुरूंना समजताच त्यांनी परीक्षा संचालकांची कानउघाडणी करीत परीक्षेसाठी बैठे पथक नेमण्याचे आदेश दिले.दुसरीकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी करत सहकेंद्रप्रमुखासह अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले आहे.परीक्षार्थीकडून धमकावण्यात देखील आले. 12 डिसेंबर पासून विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. अभियांत्रिकीच्या परीक्षांसाठी परळी येथील नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.दशरथ रोडे यांची परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख म्हणून परीक्षा विभागाने नियुक्ती केली होती. त्यानुसार रोडे परीक्षा केंद्रावर गेले दरम्यान प्रा रोडे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता पर्यवेक्षकासमोर विद्यार्थी थेट मोबाईल समोर ठेवून उत्तर पत्रिका लिहित असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी या सर्व घटनेचे व्हिडिओ काढले, त्यानंतर विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त केले. रोडे यांना काही परीक्षार्थींकडुन धमकवण्यात देखील आले. त्यामुळे,त्यांनी या सर्व प्रकरणाची लेखी तक्रार कुलगुरू यांच्याकडे केली आहे.








