मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शिवसेना रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मसूदभाई दर्जी यांचं गुरुवार दि.१४ डिसेंबर२०२३रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७२व्या वर्षी नागाव मोहल्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं.डॉ.ए.आर.उंड्रे हायस्कूल समितीच्या उपाध्यक्षपदी असलेल्या मसूदभाईंनी आपल्या विनम्र आणि मनमिळावू स्वभावाने सर्वांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं होतं.वरिष्ठांच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या शिवसेनेला उभारी देण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते.कोणत्याही आमिषाला बळी न पडता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांनी आपली पक्षनिष्ठा सिद्ध केली होती.त्यांच्या आकस्मिक जाण्याने शिवसेनेने दिलदार मनाचा एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.समाजात मानाचं स्थान असलेला मनमिळाऊ आणि संघटनेसाठी धडपडणारा एक सच्चा सहकारी गमावल्याची भावना त्यांच्या अंतिम संस्कारावेळी उपस्थित शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी व्यक्त केली.सदर प्रसंगी विविध समाजातल्या मान्यवरांसह शिवसेना माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी,श्रीवर्धन शहरप्रमुख राजेश चव्हाण,धारवली सरपंच जगन्नाथ चाचले,वांजळे सरपंच आत्माराम गायकर,महंमद मेमन, शिवसेनेचे विविध पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.त्यांच्या मागे त्यांची पत्नी,मुलं,मुली आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.








