कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद: तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडो- पाड्यातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांनिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट मशीनचे प्रात्यक्षिक तळोदा, शहादा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे यांच्या आदेशान्वये दाखवण्यात येत आहे. याप्रसंगी बहुतांश महिला, पुरुष व नवमतदार स्वयंप्रेरणेने प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सहभाग नोंदवित आहे.तळोदा तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात खेडो-पाडी आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट मशीनचा प्रसार, प्रसिद्धी व मतदारांना प्रशिक्षित करण्याचा उद्देशाने, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. या प्रात्यक्षिकासाठी नेमण्यात आलेले टीमचे प्रमुख सोमावल मंडळ अधिकारी सी.एन.सरगर, राजविहिर तलाठी प्रदीप सी. वसावे, मोदलपाडा तलाठी एम.आर.देशमुख, तळोदा आय.टी.आय.चे एस.जे. चौधरी व शिर्वे येथील कोतवाल जितेंद्र जे.वळवी आदींनी बुधवार पासून उपक्रमाची सुरुवात केली. साधारण पाच दिवस चालणाऱ्या उपक्रमात बुधावली, लोभाणी, गव्हाणीपाडा, सोमावल बु., नळगव्हाण, मेंढवड, झिरी, मोदलपाडा,सतोना,रामपूर, अंमलपाडा, रतनपाडा, शेलवाई, काकलपुर, राणापुर, शिर्वे, सोमावल खुर्द व सोरापाडा आदी गावांचा समावेश आहे.या उपक्रमाअंतर्गत प्रथम टप्प्यात पाच कर्मचाऱ्याच्या टीम कडून प्रत्येक मतदार केंद्राचे शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मतदान केंद्र असलेली जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी मोबाईल व्हॅन व्दारे भेटी दिल्या जात असून मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान करवून घेणे, सर्वांसमोर ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट मशीनमधे जमा झालेल्या पावत्यांची मोजणी करणे आदी कार्यक्रम दाखवून जनजागृती केली जात आहे तळोदा तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील मतदारांच्या जनजागृतीसाठी दिनांक १३ डिसेंबर पासून ते दिनांक १९ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या उपक्रमासाठी नेमलेल्या टीमने नुकतेच लोभाणी व गव्हाणीपाडा येथील गावांना भेटी देवून लोभाणी गृप ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील मतदारांना ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवले. याप्रसंगी गावातील बहुतांश महिला, पुरुष व नवमतदारांनी स्वयंप्रेरणेने प्रात्यक्षिकात सहभाग नोंदविला आहे.








