उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी,तळोदा
तळोदा: तळोदा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने मुख्यतः केळी, पपई, कापुस, कांदे ई. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने सर्व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असुन, कंबरडे मोडले गेले आहे.यावर शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ग्रामीण भागात उदरनिर्वाह साठी शेती हे एकमात्र साधन असून, अवकाळी व बदलते हवामान यामुळे शेतीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. त्यात केळी बागायतदार शेतकऱ्यांचे सर्वात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या बेमोसमी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची केळी व पपई पिक जमीनदोस्त झाली होती. दरम्यान लाखोंचा खर्च करूनही हातात एक दमडी आली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात पुन्हा वातावरण बदलाचा परिणाम केळी पिकांवर होतांना दिसून येत आहे. करपा सह अनेक रोगांचा प्रादुर्भाव केळी पिकावर दिसुन येत आहे. तर दुसरीकडे परिपक्व झालेल्या केळी फळ झाडावरच पिकत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे तळवे, मोड, बोरद परिसरातील केळी उत्पादक शेतकरी पुर्णपणे मेटाकुटीला आला आहे. केळी पीक हे वर्षभराचे असल्याने त्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. मागिल दोन तीन महिन्यांवर केळीला चांगल्या प्रकारे भाव असल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु दि. 26 व 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे मोहिदा, मोड, बोरद सह अनेक भागांतील गावांमध्ये लाखोंचे नुकसान झाले. त्यानंतर वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल जाणवू लागला. सकाळी थंडी, धुके व ऊन-सावलीच्या खेळामुळे केळी पिकावर वातावरणाचा विपरीत परिणाम झाला. त्यामुळे केळीच्या फळावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही शेतकरी केळी पिवळे होण्याचे कारण करपा चा प्रादुर्भाव असल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन नसल्यामुळे ते द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत.यावर शासनाने मार्ग काढून शेतकरयांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे “मागिल हंगामात साडेचार एकरात केळी पिकाची लागवड केली होती. दरम्यान वर्षभर त्यावर लाखोंचा खर्च केला परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी व वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आणि आता परिपक्व झालेले केळीचे फळ झाडावरच पिकु लागले आहे. त्यामुळे ह्या वर्षीचा हंगाम पुर्ण वाया जाण्याची भिती आहे”.
अंबालाल शिंदे, शेतकरी, मोड