बद्रीनारायण गलंडे
जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढूर येथे एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १ रोजी घडली आहे. अमरदास संजय सूर्यवंशी ( २१ ) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगीतले. पोलीस दिलेल्या माहिती नुसार डिग्रस कोंढूर येथील अमरदास सूर्यवंशी हा शेती करत होता. घरी आई , वडील , भाऊ असे कुटूंब आहे. राज्यात मागील काही दिवसापासून सुरूअसलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. कळमनुरी तालुक्यात झालेल्या आंदोलनमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. दरम्यान आज सकाळी दहा वाजता अमरदास शेताकडे जातो असे सांगून निघाला होता. मात्र तो शेतात पोहचलाच नाही. त्याने कयाधू नदीच्या पात्रात पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमरदास याला पाण्याच्या बाहेर काढून आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालय दाखल केले आहे. अमरदास याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील गोपीनवार , जमादार सुनिल रेटे , राजीव जाधव यांच्या पथकाने रणालयात भेट दिली.