शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू येथील राजीव गांधी नगर मधील महादेव मंदिरापासून धनेगाव कडे जाणाऱ्या जुन्या पाणंद रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली असून,हा रस्ता तात्काळ तयार करावा, तसेच रेल्वे पटरीवर गेट टाकावे किंवा अंडरग्राउंड रस्ता तयार करुन द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवा संघटनेच्या वतीने उप विभागीय अधिकारी सेलू यांना करण्यात आली आहे. ता. २३ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.याच रस्त्यावर नांदेड-मनमाड हा रेल्वे रस्ता आहे. या रेल्वेच्या पटरी मुळे पटरीच्या पलीकडील भागातील शेतकरी बांधवांना शेत मशागतीची कामे करणे,शेतमालाची ने-आण करणे इत्यादी शेतीची कामे करणे अत्यंत त्रास दायक झाले आहे.या रस्त्याने डीग्रसचौकी चे अंतर देखील खुप जास्त आहे , शिवाय या भागातील शेतकऱ्यांना दुसरा पर्यायी रस्ता देखील उपलब्ध नाही,त्यामुळे पटरीच्या पलीकडील शेतकऱ्यांचे रस्त्या अभावी बेहाल होत आहेत.
काही वर्षापूर्वी शेतकरयांनी स्वयंस्फूर्त पणे रस्त्यासाठी आपल्या शेताचा काही भाग देऊन राजीव गांधींनगर मधील महादेव मंदिर ते रेल्वे पटरीपर्यंत विशाल लोया यांचे शेत ते श्रीधर खेत्रे यांच्या शेतापर्यंत माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सहकार्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु सद्यपरिस्थितीत या रस्त्याचा प्रश्न अंत्यंत गंभीर झाला आहे.
शेत रस्ते तयार करण्याबाबत म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तहसीलदार मार्फत रस्ता तयार करून मिळेल असा शासन निर्णय आहे. तरी या शासन निर्णयाच्या आधारे या भागातील शेत रस्ता तयार करून शेतकऱ्यां चा शेत रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, यांच्यासह या भागातील शेतकरयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.