दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
पालघर : सध्या अगदी पालघरसारख्या आदिवासी भागातही चिमुकल्यांच्या हाती मोबाईल दिसतो. त्यामुळे लहान मुलांना आपली संस्कृती माहीत नसते; मात्र अशाही काळात डहाणूतील गंजाड शाळेतील चिमुकला तारपा वादन करत आदिवासी संस्कृती जोपासण्याचे काम करीत आहे. सूरज डोंबरे याचा तारपा वादनाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. सुरेल आवाजात तारपा वादनामुळे त्याच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.तारपा वाद्याला आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. गंजाड जिल्हा परिषद शाळेत शिकणारा चिमुकला सूरज डोंबरे हा तारपा वाजवण्यात पटाईत आहे. सूरज अगदी ज्येष्ठ कलाकाराला लाजवेल अशा सुरेख आणि मधुर आवाजात तारपा वाजवत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक जण देत आहेत. आदिवासी तरुण पिढीने आपली संस्कृती कशी जोपासावी, याचा आदर्श सूरजकडून घ्यावा,अशी प्रतिक्रिया उमटत आहे.तारपा वादनाची कला -हास होत आहे.अशी खंत सातत्याने व्यक्त होत आहे.अशा काळात सूरज तारपा वादनाने रसिकांची मने जिंकून घेत आहे.तारपा वाद्य वाजवण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा लागतो, त्यामुळे सर्वांनाच तारपावादन जमत नाही. तारपा हे आदिवासी समाजातील एकोप्याचा संदेश देणारे प्रतीक मानले जाते. मोखाड्याचे तारपा वाद्याचे जनक भिकल्यादादा यांची तारपा वादनामुळे ओळख निर्माण झाली आहे.
तारपा वाद्य भेट – सूरजच्या या कलेचे कौतुक पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी केले. त्याला आपल्या घरी बोलावत त्याला चांगल्या प्रतीचे तारपा वाद्य भेट म्हणून दिले. तसेच आर्थिक मदत केली. तसेच त्याला अभ्यासाकडे लक्ष देत ही कला जोपास असा सल्ला दिला. पुढील शिक्षणासाठी मदतीचे आश्वासनदेखील त्यांनी दिले. या वेळी गंजाड येथील जानी वरठा, शंकर कुवरा शिक्षक दामोदर गोरखना, नरेश आहडी, निवास वरठा आदी उपस्थित होते. कासा – पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी सूरजच्या तारपा वादनाच्या कलेचे कौतुक केले.


