संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्या समवेत परिवहन कार्यालय, ओरस येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांना मारक ठरणाऱ्या निर्णया विरोधात रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन या प्रश्नावरती त्यांना धारेवरती धरुन जाब विचारला.तसेच त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.शेवटी या चर्चे दरम्यान असे ठरविण्यात आले की, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आर.टी.ए. कमिटीच्या २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मिटिंगमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येऊन, जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालकांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांनी दिले. याबाबत योग्य तोडगा काढून न्याय होत नाही तोपर्यंत सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे रिक्षा व्यवसायिक आपला व्यवसाय करत आहेत तसाच चालू ठेवतील व गुण्यागोविंदाने राहून व्यवसाय करतील अशी अपेक्षा श्री.काळे यांनी व्यक्त केली.तसेच ज्या रिक्षा मालकाचा मृत्यू झाला आहे, अशा रिक्षा मालकाचा परवाना त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी आजपर्यंत तहसीलदार यांच्यासमोर केलेले संमत्तीपत्र व वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊनच रिक्षा परवाना त्या रिक्षा मालकांच्या पत्नीच्या नावे होत होता. परंतु आता वारस तपास प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र घेण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. ही अट रद्द करून फक्त वरील कागदपत्रांची पूर्तता करून मयत रिक्षाचालकांच्या पत्नीच्या नावे परवाना व्हावा. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.त्यावरती सकारात्मक चर्चा करण्यात आली. सुरुवातीला बैठक वादळी चर्चेने होऊन नंतर मात्र खेळीमेळीच्या वातावरणात सर्व निर्णय आर.टी.ए.कमिटीकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिंद्रे, जिल्हा सचिव तथा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ओरसकर,पोईप आदर्श रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संदीप सावंत, त्याचप्रमाणे मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच श्री.झणझणे, श्री.खंदारे व रिक्षा चालक मालक उपस्थित होते.