संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक हे जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतात हे धोरण उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अन्याय कारक आहे. या निर्णयाचा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जोरदार विरोध करुन या निर्णयाचा निषेध केला आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालक मालक यांच्यामध्ये आपापसामध्ये मोठे वाद विवाद निर्माण होऊन एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रसंग उद्भवू शकतात.कारण कणकवलीचा रिक्षा चालक हा कुडाळला जाऊन व्यवसाय करू शकतो. असे मत परिवहन विभागाचे आहे. परंतु कुडाळचे रिक्षाचालक हे कणकवलीच्या रिक्षाचालकाला आपल्या स्टॅन्डला रिक्षा व्यवसाय करायला देणार नाहीत.व यातूनच डोकी फुटली जाऊ शकतात. याचा विचार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा तसेच यावरून रिक्षाचालकांमध्ये कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे हेच सर्वस्वी जबाबदार असतील असा सज्जड इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी दिला आहे.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे असे म्हणणे आहे, आत्ता नवीन धोरणानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा परवाने देण्यात येत आहेत व दिलेले आहेत ते सर्व जिल्हा परवाना आहेत. असे श्री.काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुठचाही रिक्षाचालक कुठेही व्यवसाय करू शकतो. असे म्हणणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आहे. परंतु त्या रिक्षा चालकांना परवाना देताना त्यांचा स्थायी पत्ता ज्या तालुक्यातील गाव आहे ते रिक्षा स्टॅन्ड त्याला देण्यात यावे. तसेच क्र.उप प्रापका/सिंधु/नोंदणी/०७/जावक क्रमांक ३०८२ सिंधुदुर्ग कार्यालय दिनांक २०/११/२००७ च्या परिपत्रकानुसारच रिक्षा व्यवसाय करण्यास मुभा द्यावी. त्याचप्रमाणे जे तालुका परवाने (f) व गाव परवाने आहेत, त्यांना रोड टॅक्स, विमा, परवाना नूतनीकरण, पासिंग फी अन्य सर्व कागदपत्रांची फी ही जिल्हा परवान्या प्रमाणेच भरावी लागत आहे. मग हा दुजेभाव कशासाठी ? त्यामुळे गाव परवाने, तालुका परवाने यांना सुद्धा जिल्हा परवाना म्हणून मान्यता देण्यात यावी.तसेच आज मीती पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक हे गुण्या गोविंदाने व्यवसाय करीत आहेत, परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जिल्ह्यातील रिक्षाचालक मालक यांच्या मध्ये रिक्षा लावण्यावरुन भांडणे होणार आहेत व त्याची सर्वस्वी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची असेल. या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी केले आहे.


