प्रमोद डफळ
शहर प्रतिनिधी राहुरी
राहुरी विद्यापीठ, दि. 2 नोव्हेंबर, 2023 जागतिक बँक अर्थसहाय्यीत उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली, यांचे संयुक्त विद्यमाने हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असुन या केंद्राअंतर्गत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासाठी अॅग्रीप्लास्ट टेक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. राजीव रॉय प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पाअंतर्गत आयोजीत करण्यात येणार्या विविध कार्यशाळांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की कार्यशाळांचा उपयोग शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शेतकरी यांना संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्ससाठी उच्च तंत्रज्ञान व भांडवली खर्च लागतो. शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सदर विषयाबाबतीत शेतीविषयी उत्सुकता आहे तसेच शासनासाठी विविध धोरणे ठरवण्यासाठी म्हणुन उपयोग होईल. प्रमुख पाहुणे इंजि.राजीव रॉय यांनी हरितगृह प्रकल्पाविषयी सखोल मार्गदर्शन केले. उद्घाटनाप्रसंगी कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व वक्त्यांचे स्वागत व ओळख करुन दिली. या कार्यशाळेसाठी न्यूट्रीफ्रेश फार्म टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत मेहता, फ्लोराचे संस्थापक प्रविण शर्मा, निओपोनिक्स प्रोजेक्टस इंडिया प्रा. लि.चे संस्थापक के. प्रभुशंकर आणि एशिया पॅसिफिक प्रदेशाचे उपाध्यक्ष भारत भोजने, हिंदुस्थान कृषि व्यवसाय प्रा. लि.चे संचालक गणेश कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी त्यांनी एरोपोनिक्स विषयी महत्व, गरज, फायदे, उभ्या (व्हर्टीकल), हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्ससाठी आवश्यक असलेली नियंत्रीत हवामान प्रणाली, विविध मॉडेल, हायड्रोपोनिक्स भविष्य वरदान याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी विविध राज्यातुन एकुण 70 प्राध्यापक, विद्यार्थी आणि शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सायली बिरादर आणि आभार प्रदर्शन चि. सागर मजिक यांनी केले. या कार्यशाळेचे कामकाज डॉ. वैभव माळुंजकर डॉ. अनिल पटेल, इंजि. अभिषेक दातीर, इंजि. शुभम सुपेकर यांनी पाहिले.